सिडनी - भारत-अ संघाविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज विल पुकोव्स्कीच्या डोक्याला चेंडू लागला. त्यानंतर पुकोव्स्कीला मैदान सोडावे लागले. या दुखापतीमुळे तो शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या सराव सामन्यात खेळू शकणार नाही. मात्र, ही दुखापत गंभीर नसल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा दिसणार सुरेश रैना!
१७ डिसेंबरला होणाऱ्या अॅडलेड ओव्हलवरील भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी संघात पुकोव्स्कीची जागा निश्चित मानली जात आहे. या सामन्यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे.
ऑस्ट्रेलियन-अ संघाच्या डावाच्या १३व्या षटकात पुकोव्स्कीच्या डोक्याला चेंडू लागला. वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी हे षटक टाकत होता. या चेंडूनंतर तो जमिनीवर कोसळला. रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर तो ड्रेसिंग रूममध्ये परतला. २२ वर्षांच्या पुकोव्स्कीने पहिल्या सामन्यात १ आणि २३ धावा केल्या. यापूर्वी तो सात-आठ वेळा जखमी झाला आहे.