सिडनी - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणार्या चौथ्या कसोटी सामन्याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, कोरोनाच्या प्रोटोकॉलमुळे भारतीय संघाला चौथ्या कसोटीसाठी ब्रिस्बेनला जायची इच्छा नाही. १५ जानेवारीपासन बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील शेवटची कसोटी खेळवली जाणार आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये १४ दिवसांचा क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण केल्यानंतर मनमोकळेपणाने वागणूक आणि फिरण्याचे भारतीय संघाने या दौऱ्याआधी स्पष्ट केले होते. जर संघ ब्रिस्बेनला गेला, तर तिथे त्यांना फक्त स्टेडियम ते हॉटेल आणि हॉटेल ते स्टेडियमकडे जाण्याची परवानगी असेल. याशिवाय ते कोठेही जाऊ शकत नाहीत. या कारणामुळे भारतीय संघ ब्रिस्बेनला जाऊ इच्छित नाही.
एका सूत्राने सांगितले की, "सर्वप्रथम आम्ही दुबईमध्ये १४ दिवस क्वारंटाइन राहिलो. त्यानंतर आम्ही सिडनीला १४ दिवस क्वारंटाइन राहिलो. याचा अर्थ असा की, आम्ही जवळजवळ महिनाभर घालवला आहे. त्यामुळे आम्हाला दौर्याच्या शेवटी अजून एकदा क्वारंटाइन राहायचे नाही. पुन्हा एकदा आम्हाला ब्रिस्बेनला हॉटेलमध्ये राहायचे नाही. एकाच मैदानावर दोन्ही सामने खेळून घरी परतण्याची आमची इच्छा आहे.''
७ जानेवारीपासून सिडनी येथे मालिकेचा तिसरा आणि १५ जानेवारीपासून ब्रिस्बेन येथे चौथा सामना खेळला जाईल.
हेही वाचा - WHAT A START!!..नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी क्रिकेटपटूने केला साखरपुडा