लंडन - भारत आणि इंग्लंड यांच्यात नॉटिंघममध्ये खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यात षटकाची गती संथ राखल्याने, आयसीसीने दोन्ही संघाला दंड ठोठावला आहे. आयसीसीने भारत आणि इंग्लंड संघाचे जागतिक कसोटी अंजिक्यपद स्पर्धेतील 2-2 गुण कमी केले आहेत. याशिवाय दोन्ही संघाची 40 टक्के फीमध्ये कपात केली आहे.
दरम्यान, आयसीसीच्या या कारवाई नंतर देखील भारतीय संघ या गुणतालिकेमध्ये अव्वलस्थानी कायम आहे. तर इंग्लंड दुसऱ्या स्थानी आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील पहिला सामना नॉटिंघममध्ये झाला. या सामन्यात भारतीय संघ इंग्लंडवर वरचढ होता. परंतु सामन्याच्या अखेरच्या दिवशी पावसाने खोडा घातला. यामुळे भारतीय संघाची विजयाची संधी हुकली. पावसाने पाचव्या दिवसाचा संपूर्ण खेळ होऊ शकला नाही.
आयसीसीने या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंची 40 टक्के फी कपात केली आहे. सामनाधिकारी ख्रिस ब्राँड यानी ही कारवाई केली. नॉटिंघम कसोटीत दोन्ही संघांनी निर्धारित वेळेपेक्षा 2-2 षटके कमी गोलंदाजी केली. आयसीसी नियम 2.22 चा हा भंग आहे. यात कोणत्याही संघाने जर निश्चित वेळेत षटके पूर्ण केली नाही तर त्यांना दंडाची शिक्षा केली जाते.
दरम्यान, उभय संघात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. यातील पहिला सामना ड्रॉ राहिला. तर उद्या गुरूवारपासून दुसऱ्या सामन्याला सुरूवात होणार आहे.
हेही वाचा - Ind vs Eng 2nd Test, PREVIEW: शार्दुल ठाकूरला दुखापत, अश्विनला मिळणार संधी?
हेही वाचा - ICC Test Rankings: विराटची घसरण, जसप्रीत बुमराहची भरारी