मोहाली - टी20 मालिकेत क्लीन स्वीप दिल्यानंतर भारताने कसोटीतही श्रीलंकेवर 1-0 असा विजय मिळवला ( IND VS SL 1st ) आहे. भारताने श्रीलंकेवर एक डाव आणि 222 धावांनी विजय प्राप्त केला आहे. 175 रन आणि 9 विकेट घेणाऱया रवींद्र जाडेजाच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारताने विजयाची नोंद केली आहे.
भारतीय संघाने आपला पहिला डाव दुसऱ्या दिवशी 8 बाद 574 धावांवर घोषित केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवसा अखेर श्रीलंका संघाने 4 बाद 108 धावा केल्या होत्या. त्यानंतर पुढे खेळताना आज (रविवारी) सकाळी श्रीलंका संघ 65 षटकांत 174 धावांवर गारद ( Sri Lanka all out 174 runs ) झाला. भारताकडून गोलंदाजी करताना रविंद्र जडेजाने आपल्या फिरकीच्या तालावर श्रीलंका संघाला नाचवले. त्याने 13 षटकांत 41 धावा देताना 5 बळी घेतले. त्याचबरोबर बुमराह आणि आश्विन यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तसेच शमीने 1 बळी घेतला.
श्रीलंका संघाकडून फलंदाजी करताना सर्वाधिक धावा पथुम निसांकाने केल्या. त्याने 133 चेंडूचा सामना करताना 61 धावांची चिवट खेळी केली. परंतु, त्याला इतर संघ सहकाऱ्यांकडून हवी तशी साथ मिळाली नाही. श्रीलंकेच्या इतर कोणत्याच फलंदाजाला 30 धावांचा टप्पा देखील पार करता आला नाही. यापैकी तळातील चार फलंदाजांना तर भोपळा देखील फोडता आला नाही. त्यामुळे श्रीलंका संघाचा पहिला डाव 65 षटकांत 174 धावांवर गुंडाळला.
रोहित शर्माचा कसोटी कर्णधार म्हणून पहिलाच सामना होता. श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. रवींद्र जाडेजाने या सामन्यात 175 धावांची उल्लेखनीय खेळी करत 9 विकेट घेतल्या. विराट कोहलीचाही 100 वा कसोची सामना होता. दरम्यान, आता दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना बँगलोरमध्ये 12 मार्चपासून होणार आहे. हा सामना गुलाबी चेंडुने खेळला जाईल.