कोलकाता: अॅडलेड ओव्हल येथे गुरुवारी झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून भारताचा पराभव झाल्याने स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघात ज्या उणिवा होत्या त्या उघड झाल्या. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ कोणत्याही ठोस योजनेशिवाय ऑस्ट्रेलियात खेळण्यासाठी गेला होता. सविस्तरित्या जाणून घेवूया टीम इंडिया कशाप्रकारे अपयशी ठरली.
मोहम्मद शमीची निवड कोणत्या आधारावर? : सुरुवातीला संघाची घोषणा करताना मोहम्मद शमीचे नाव चर्चेत नव्हते. मात्र जसप्रीत बुमराहला ऐनवेळी झालेल्या दुखापतीमुळे बंगालच्या या वेगवान गोलंदाजाला ऑस्ट्रेलियात बोलावण्यात आले. ज्या पद्धतीने शमीचा संघात समावेश करण्यात आला, त्याचा उपयोग संघाच्या गरजा आणि निकड लक्षात घेऊन व्हायला हवा होता.
सलामीवीरांची खराब कामगिरी - सलामीवीर केएल राहुलमध्ये स्पर्धेत सपशेल अपयशी ठरला. तर कर्णधार रोहित शर्मा कर्णधारपदाच्या ओझ्याखाली दबलेला दिसत होता. रोहित शर्माला कोणताही दूरगामी विचार मांडता आला नाही. या दोघांच्या खराब सुरुवातीमुळे भारतीय संघाला पारी सावरण्यासाठी वारंवार विराट कोहलीवर अवलंबून राहावे लागले.
भारताला नशीबाची साथ - स्पर्धेच्या आधी आउट ऑफ फॉर्म असणारा कोहली मोक्याच्या वेळी फॉर्म मध्ये आला. त्यामुळे संघाचा कमकुवतपणा झाकून गेला. खेळाबरोबरच भारताला नशिबाची देखील साथ मिळाली. पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध भारताला निसटता विजय मिळाला. मात्र दक्षिण आफ्रिकेकडून भारताला पराभव पत्कारावा लागला होता. उपांत्य फेरीत मात्र भारत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही.
दिनेश कार्तिकचा प्रयोग अपयशी - दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्याबाबत टीम इंडियाकडे स्पष्ट योजना नव्हती. सर्वात लहान फॉरमॅटमध्ये फिनिशर असलेल्या कार्तिकचा सुरुवातीला संधी देण्यात आली मात्र त्यात तो अपयशी ठरला. एक प्रतिभावान खेळाडू म्हणून, पंतला प्लॅन बी मध्ये आणले जाणार होते, परंतु तो देखील संधीचा फायदा घेण्यास आणि आपली प्रतिभा दाखवण्यात अपयशी ठरला. फलंदाजीत केवळ सूर्यकुमार यादवने कोहलीसोबत शानदार खेळ दाखवला. या जोडीच्या जोरावर भारताने उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठली.
वेगवान गोलंदाजांना बॅकअप नाही - संघ व्यवस्थापनाने भुवनेश्वर कुमार आणि युवा सनसनी अर्शदीप सिंग याच्यासोबत स्पर्धेत जाण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये गोलंदाज म्हणून योग्य कामगिरी केली होती. परंतु ते अयशस्वी झाल्यास बॅकअप योजना नव्हती. शमी, हार्दिक पंड्या, अश्विन आणि अक्षर पटेल हे गोलंदाज म्हणून संघात होते परंतु विजयाचा फॉर्म्युला ते देऊ शकले नाहीत.
युजवेंद्र चहलला संधी का नाही? - युजवेंद्र चहलच्या रूपाने भारताकडे एक दमदार लेग स्पिनर होता. मात्र त्याला विश्वचषकात एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. अक्षर आणि रवी अश्विनच्या अपयशानंतरही संघ व्यवस्थापाने चहलला संधी दिली नाही.
राहुल द्रविडचे कोच म्हणून भविष्य काय? - मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसाठीही हा विश्वचषक विस्मरणीय ठरला. द्रविड हा खेळाच्या इतिहासातील महान फलंदाजांपैकी एक आहे, परंतु त्याला त्याच्या काळातील सरासरी कर्णधार आणि प्रशिक्षक म्हटले जाऊ शकते. प्रशिक्षक म्हणून द्रविड टी-२० विश्वचषकातील भारताची कामगिरी लक्षात घेता छाप पाडण्यात अपयशी ठरला आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ही परिस्थिती कशी हाताळते आणि भविष्यासाठी कशी तयारी करते याची प्रतीक्षा करावी लागेल.