दुबई - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना काही दिवसांपूर्वीच पार पडला. न्यूझीलंडने या सामन्यात भारताचा ८ गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. आता आयसीसीने दुसऱ्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या, हंगामाची तयारी सुरू केली आहे. या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पॉईंट सिस्टमध्ये आयसीसीने काही बदल केले आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाला सुरुवात होणार आहे. या नव्या हंगामासाठी आयसीसीने 'पॉईंट सिस्टीम'मध्ये बदल केला आहे. दुसऱ्या हंगामात प्रत्येक सामन्यातील विजेत्या संघाला १२ गुण दिले जाणार आहेत. तसेच सामना बरोबरीत राहिल्यास दोन्ही संघांना समान प्रत्येकी सहा गुण, तर सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी चार गुण दिले जातील.
आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ अॅलर्डाइस यांनी 'पॉईंट सिस्टीम'मध्ये बदल करणार असल्याचे जाहीर केले होते. यामुळे नेमके काय बदल होणार? याची उत्सुकता पाहायला मिळत होती. जेफ अॅलर्डाइस यांनी सांगितल्याप्रमाणे आता पॉईंट देण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आला आहे.
पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत प्रत्येक मालिकेत १२० गुण दिले जात होते. कसोटी मालिका दोन सामन्यांची आहे किंवा पाच सामन्यांची, याचा यात विचार केला जात नव्हता. परंतु दुसऱ्या हंगामात प्रत्येक सामन्याला समान गुण दिले जाणार आहेत. प्रत्येक सामन्यातील विजेत्या संघाला १२ गुण मिळतील. संघांनी किती सामन्यांमध्ये किती गुण मिळवले याच्या टक्केवारीनुसार त्यांचे गुणतालिकेतील स्थान ठरणार आहे.
हेही वाचा - ICC Rankings : स्टिव्ह स्मिथला धक्का देत केन विल्यमसन पहिल्या स्थानावर, जाणून घ्या विराटची क्रमवारी
हेही वाचा - WI vs SA ३rd T२०: अखेरच्या चेंडूवर षटकार आणि श्वास रोखून धरायला लावणारे ६ चेंडू