अहमदाबाद Rohit Sharma Record : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेट विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे पार पडला. यात ऑस्ट्रेलियाने भारताला सहा विकेटने पराभूत करत सहाव्यांदा विश्वचषक कपवर आपले नाव कोरले. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
एका विश्वचषकात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रोहितनं शानदार खेळी केली. रोहित या सामन्यात अर्धशतक झळकावण्यात कमी पडला मात्र त्यानं आपलं नाव इतिहासात कोरलं आहे. रोहित शर्मानं या विश्वचषकात १२५.९४ च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटसह १ शतक आणि ३ अर्धशतकांच्या मदतीनं ५९७ धावा केल्या. या स्फोटक कामगिरीसह, रोहित एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला आहे.
'या' कर्णधाराचा विक्रम मोडला : या विश्वचषकात कर्णधार म्हणून रोहितनं ५९७ धावा केल्या. विश्वचषकात अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला कर्णधार ठरला आहे. रोहितनंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (५७८ धावा), श्रीलंकेचा कर्णधार महेला जयवर्धने (५४८ धावा), ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंग (५३९ धावा) आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच (५०७ धावा) यांचा क्रम लागतो.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये ४७ धावा : आयसीसी विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात रोहित शर्मा डावाची सुरुवात करण्यासाठी आला. प्रत्येक सामन्याप्रमाणे यावेळीही त्यानं वेगवान फलंदाजी करत ४७ धावा ठोकल्या. ऑस्ट्रेलियाच्या भक्कम गोलंदाजीसमोर रोहितनं ३१ चेंडूत ४ उत्कृष्ट चौकार आणि ३ गगनचुंबी षटकारांसह १५१.६१ च्या स्ट्राईक रेटनं ४७ धावा केल्या. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं ५० षटकात १० गडी गमावून २४० धावा केल्या आहेत.
हेही वाचा :