अहमदाबाद Ind Vs Aus Final Match : विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला आणि स्टेडियमवर पोहोचलेल्या १ लाख पेक्षा जास्त चाहत्यांची निराशा झाली. प्रत्येक चाहत्याला, मग तो स्टेडियमच्या आत असो किंवा देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात असो, विश्वचषकाची ट्रॉफी भारतीय संघातील खेळाडूंच्या हातात असावी आणि या क्षणाचे साक्षीदार व्हावं, अशी इच्छा होती. मात्र तसं झालं नाही. ऑस्ट्रेलियानं शानदार खेळ करत अंतिम सामना ६ गडी राखून जिंकला.
- जेव्हा भारतीय संघ पराभवाच्या गर्तेत सापडला होता आणि एकही विकेट घेऊ शकत नव्हता, तेव्हा ही चाहती खूप भावूक दिसत होती.
- ही चाहती हात जोडून देवाला भारतीय संघाला बळ देण्याची आणि विकेटसाठी विनंती करताना दिसत आहे.
- या छोट्या चाहतीची इच्छा भारताला विश्वचषक जिंकताना पाहण्याची होती. मात्र दुर्दैवानं तसं होऊ शकलं नाही.
- गालावर आणि गळ्यात भारतीय ध्वज लावलेला हा चाहता खूपच निराश झाला आहे. भारतीय संघ हरतोय यावर त्याचा विश्वास बसत नाहीये. या चाहत्याच्या मनातील वेदना फक्त भारतीय चाहतेच समजू शकतात.
- हे चित्र तेव्हाचं आहे जेव्हा भारतीय संघानं रिव्हू घेतला होता. स्क्रीनवर लाबुशेन नाबाद असल्याचं दिसलं आणि त्यानंतर जसप्रीत बुमराहनं तोंडावर हात झाकून मान खाली घातली. त्याचवेळी मागे उभा असलेला भारतीय संघही असहाय्य दिसत होता.
- भारतीय संघाच्या पराभवानंतर मोहम्मद सिराज रडू लागला. तेव्हा शेजारी उभ्या असलेल्या जसप्रीत बुमराहनं त्याचं सांत्वन केलं आणि धीर धरण्याचा सल्ला दिला. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
- पराभवानंतर रोहित शर्मा ड्रेसिंग रूममध्ये परततानाचा फोटो सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल झाला. रोहित शर्मा निराश मनानं ड्रेसिंग रूममध्ये परतला. रोहित शर्माच्या नजरा फक्त विश्वचषकाच्या ट्रॉफीकडे होत्या, मात्र ती जिंकू न शकल्यानं त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत.
- भारतीय संघाच्या पराभवानंतर, विराट कोहली जेव्हा पत्नी अनुष्का शर्माकडे गेला तेव्हा अनुष्कानं त्याला मिठी मारली. विराट कोहली जणू त्याच्या वेदना सांगण्यासाठी आधाराच्या शोधात होता.
- विश्वचषकाच्या पोस्ट प्रेजेंटेशन दरम्यान विराट कोहली आणि प्रशिक्षक राहुल द्रविड अतिशय उदास मूडमध्ये उभे होते. प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मैदानाबाहेर संघाच्या प्रत्येक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
- पोस्ट प्रेजेंटेशन दरम्यान दुसऱ्या संघातील खेळाडूकडे ट्रॉफी आणि पदक जाताना पाहून रोहित शर्मा पुन्हा रडला. त्यांचा हा फोटो पाहून प्रत्येक भारतीय चाहता भावूक झाला आहे.
- पराभवानंतर विराट कोहली इतका दु:खी झाला होता की, त्यानं तोंडावर टोपी टाकली आणि ड्रेसिंग रूमच्या दिशेनं रवाना झाला.
- केएल राहुलचा हा फोटो चाहत्यांनाही भावूक करत आहे. या यष्टीरक्षक फलंदाजानं पराभवानंतर दीर्घ श्वास घेतला आणि वर पाहू लागला. जणू तो त्याच्या डोळ्यातील अश्रूंना परत जायला सांगत आहे.
- सामना संपल्यानंतर नरेंद्र मोदींनी मोहम्मद शमीला मिठी मारून त्याचं सांत्वन केलं आणि त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याचं अभिनंदन केलं.
हेही वाचा :