केपटाऊन (द. आफ्रिका) : सोमवारी येथे झालेल्या महिला टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या सराव सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून 44 धावांनी पराभव पत्करावा लागला. भारतीय संघासमोर 130 धावांचे लक्ष्य होते पण भारताचा संपूर्ण संघ 16 षटकात 85 धावांत गारद झाला.
केवळ तीन फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला : भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक नाबाद 19 धावा केल्या. तर अतिरिक्त धावांची संख्या 18 होती. भारताच्या केवळ तीन फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. हरलीन देओलने 12 आणि अंजील सरवानीने 11 धावा केल्या. भारताचे शीर्ष फळीतील चार फलंदाज 22 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यामध्ये अनुभवी स्मृती मानधना (0) आणि शेफाली वर्मा (2) यांचा समावेश होता. कर्णधार हरमनप्रीत कौरने फलंदाजी केली नाही.
ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांचे योगदान : ऑस्ट्रेलियाकडून डार्सी ब्राऊनने 17 धावांत चार विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाने तत्पूर्वी तळातील फलंदाजांच्या योगदानाच्या जोरावर आठ गड्यांच्या मोबदल्यात 129 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जॉर्जिया वेरेहॅमने सर्वाधिक नाबाद 32 धावा केल्या. भारतातर्फे शिखा पांडे, पूजा वस्त्राकार आणि राधा यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी : भारत आपला पुढचा सराव सामना ८ फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. महिला T20 विश्वचषक चॅम्पियन होण्यासाठी 10 संघ स्पर्धा करतील. 10 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेची ही आठवी आवृत्ती आहे. पहिला सामना दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणार आहे. विश्वचषकात भारताचा पहिला सामना 12 फेब्रुवारीला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.
अंतिम सामना 26 फेब्रुवारीला : 17 दिवस चालणाऱ्या विश्वचषकाचा अंतिम सामना 26 फेब्रुवारीला होणार आहे. दक्षिण आफ्रिका आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. विश्वचषकात सहभागी होणाऱ्या सर्व संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. 'अ' गटात यजमान दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, बांगलादेश आणि श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. तर 'ब' गटात भारत, पाकिस्तान, इंग्लंड, आयर्लंड आणि वेस्ट इंडिज हे संघ आहेत. भारतीय संघ 15 वर्षांपासून विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवू शकलेला नाही. मात्र यावेळी तो इतिहास रचू शकतो.