दुबई - भारतीय संघाने दमदार खेळ करत ओवलमध्ये खेळवण्यात आलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा 157 धावांनी पराभव केला. भारताच्या या विजयात रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि शार्दुल ठाकूर हे तिघे हिरो ठरले. या कामगिरीचा फायदा त्यांना आयसीसी क्रमवारीत झाला आहे.
आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यात रोहित शर्मा फलंदाजांच्या क्रमवारीत पाचव्या स्थानावर कायम आहे. पण त्याने 800 गुणांचा आकडा पार केला आहे. रोहितने पहिल्यादांच कसोटी रॅकिंगमध्ये 800 गुणांचा टप्पा पार केला. त्याने चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात 127 धावांची खेळी केली. फलंदाजांच्या क्रमवारीत जो रूट पहिल्या स्थानावर आहे. यानंतर केन विल्यमसन, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन यांचे नाव येतं. रोहित शर्मानंतर कर्णधार विराट कोहली सहाव्या स्थानावर आहे.
जसप्रीत बुमराहची क्रमवारी सुधारली
जसप्रीत बुमराह याने चौथ्या डावात भेदक गोलंदाजी केली. त्याने सहा षटकाचा जो स्पेल टाकला तो तर अप्रतिम ठरला. या स्पेलमुळे भारताच्या विजयाचे दरवाजे उघडले. पहिल्या डावात हिरो ठरलेला ओली पोप आणि त्यानंतर जॉनी बेयरस्टोची त्याने विकेट घेतली. या कामगिरीचा फायदा जसप्रीत बुमराहला झाला आहे. तो एका स्थानाच्या सुधारणेसह नवव्या स्थानावर पोहोचला आहे. या कसोटी आधी तो दहाव्या स्थानावर होता. या यादीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स अव्वलस्थानावर आहे. तर भारताचा आर. अश्विन दुसऱ्या स्थानी आहे.
शार्दुल ठाकूरची अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भरारी
शार्दुल ठाकूरने फलंदाजीसोबत गोलंदाजीत आपले योगदान दिले. त्याने दोन्ही डावात अर्धशतक झळकावले. त्याने पहिल्या डावात 57 तर दुसऱ्या डावात 60 धावांची खेळी केली. या कामगिरीचे फळ त्याला मिळाले. तो कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत 20व्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडच्या ख्रिस वोक्सला एका स्थानाने फायदा झाला असून तो 10 व्या स्थानावर पोहोचला आहे. वोक्सने भारताच्या पहिल्या डावात 4 गडी बाद केले होते. यानंतर त्याने फलंदाजीत 50 धावांची खेळी केली होती.
हेही वाचा - जोस बटलर आणि जॅक लीचची इंग्लंड संघात वापसी, अंतिम कसोटीत जेम्स अँडरसनला विश्रांती?
हेही वाचा - गाठ तुटली! शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांचा लग्नाच्या 8 वर्षानंतर घटस्फोट