दुबई - पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने एकदिवसीय रँकिंगमध्ये अव्वलस्थान मिळवल्यानंतर आता टी-20 रँकिंगमध्येही आपली छाप सोडली आहे. तो टी-२० क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
आयसीसीने टी-२० ची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यात बाबर आझमने ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅरॉन फिंचला मागे टाकत दुसरे स्थान काबीज केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत बाबर आझमने एक शतक आणि दोन अर्धशतकासह २१० धावा केल्या होत्या. या कामगिरीचा फायदा त्याला क्रमवारीत झाला आहे.
टी-२० क्रमवारीत इंग्लंडचा डावखुरा फलंदाज डेव्हिड मलान अव्वलस्थानी आहे. त्याचे ८९२ गुण आहेत. बाबर आझम ८४४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. फिंचला त्याने १४ गुणांनी मागे टाकले आहे. फिंचच्या खात्यात ८३० गुण आहेत.
न्यूझीलंडचा युवा फलंदाज डेवॉन कॉन्वे ७७४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. त्याच्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा नंबर आहे. विराटचे ७६२ गुण आहेत. पहिल्या दहामध्ये विराटशिवाय लोकेश राहुल सातव्या स्थानावर असून त्याची एका स्थानाने घसरण झाली आहे.
हेही वाचा - RCB VS RR : बंगळुरूने नाणेफेक जिंकली, राजस्थानची प्रथम फलंदाजी
हेही वाचा - KKR VS CSK : रसेलला 'या' गोष्टीचा नक्कीच पश्चाताप झाला असेल - गंभीर