दुबई Marlon Samuels : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) भ्रष्टाचाराविरोधात मोठं पाऊल उचलत वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज क्रिकेटपटू मार्लोन सॅम्युअल्सवर सहा वर्षांची बंदी घातली. सॅम्युअल्सला अमिराती क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलंय. आयसीसी एचआर आणि इंटिग्रिटी युनिटचे प्रमुख अॅलेक्स मार्शल यांनी गुरुवारी सॅम्युअल्सवरील बंदीची घोषणा केली.
काय आरोप आहेत : मार्शल म्हणाले की, "सॅम्युअल्स जवळपास दोन दशकं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. तो आता निवृत्त झाला असला तरी, जेव्हा गुन्हे घडले तेव्हा त्यात त्याचा सहभाग होता." आयसीसीनं सप्टेंबर २०२१ मध्ये सॅम्युअल्सवर आरोप लावले होते. त्यानं अमिराती क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचार विरोधी संहितेच्या कलम २.४.२, २.४.३, २.४.६ आणि २.४.७ चं उल्लंघन केलं आहे. मार्लन सॅम्युअल्सनं २०१९ अबू धाबी टी १० लीग दरम्यान भ्रष्टाचारविरोधी नियम तोडले. या गुन्ह्यांमध्ये तो या वर्षी ऑगस्टमध्ये दोषी आढळला. टी १० लीगचा चौथा सीझन अबू धाबीमध्ये जानेवारी ते फेब्रुवारी २०१९ दरम्यान खेळला गेला. सॅम्युअल्स तेव्हा कर्नाटक टस्कर्स संघाचा भाग होता, ज्याचा कर्णधार हाशिम आमला होता.
या आधीही बंदी घातली होती : ४२ वर्षीय मार्लन सॅम्युअल्सचं वादांशी जुनं नातं आहे. २००८ मध्ये, आयसीसीनं त्याला पैसे घेणं आणि क्रिकेटची बदनामी केल्याबद्दल दोषी ठरवलं होतं. तेव्हा त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. याशिवाय आयसीसीनं २०१५ मध्ये त्याची गोलंदाजी बेकायदेशीर ठरवली होती. तेव्हा त्याच्यावर एक वर्षासाठी गोलंदाजी करण्यास बंदी घातली होती. २०१४ मध्ये त्यानं तत्कालीन कर्णधार ड्वेन ब्राव्होच्या बोर्डासोबतच्या पेमेंट विवादामुळे भारत दौऱ्यातून माघार घेण्याच्या निर्णयालाही विरोध केला होता.
वेस्ट इंडिजसाठी दमदार प्रदर्शन : सॅम्युअल्सनं वेस्ट इंडिजसाठी ७१ कसोटी, २०७ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि ६७ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर १७ शतकांसह तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण ११,१३४ धावा आहेत. याशिवाय त्यानं १५२ आंतरराष्ट्रीय विकेट्सही घेतल्या आहेत. या काळात त्यानं एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिज संघाचं नेतृत्वही केलं. सॅम्युअल्सनं २०१२ आणि २०१६ च्या टी २० वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या दोन्ही विश्वचषकांच्या अंतिम फेरीत तो 'प्लेअर ऑफ द मॅच' होता.
हेही वाचा :