अहमदाबाद - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा खराब फॉर्म अजूनही संपलेला नाही. गेल्या १५ महिन्यांपासून विराटने एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावलेले नाही. इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात विराटकडून संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण विराटने सर्वांना निराश केले. इतकेच नव्हे तर, त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या लाजिरवाण्या कामगिरीशी बरोबरी साधली.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणार्या चौथ्या कसोटीच्या दुसर्या दिवशी विराट खाते न उघडता तंबूत परतला. पुजारानंतर मैदानात आलेल्या विराटने आठ चेंडू खेळले. मात्र, तो बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. कर्णधार म्हणून विराट शून्यावर बाद होण्याची ही आठवी वेळ होती. विराटने धोनीच्या नकोशा विक्रमाची बरोबरी केली. धोनीही कसोटीत आठ वेळा शून्यावर बाद झाला आहे.
आतापर्यंत कसोटी कारकिर्दीत विराट बाराव्यांदा शून्यावर बाद झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. याआधी २०१४मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळताना विराटला लियाम प्लंकेट आणि जेम्स अँडरसनने बाद केले होते. आता यावेळेस मोईन अली आणि बेन स्टोक्सने विराटला बाद केले. विराटने नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेश विरुद्ध ईडन गार्डन्सवर आपले शेवटचे शतक ठोकले होते.