चेन्नई - भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई येथे पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने ६ गडी गमावत २५७ धावा केल्या. यजमान संघ अद्याप इंग्लंडपासून ३२१ धावांनी मागे आहे. भारतीय डावात रिषभ पंतने आक्रमक फलंदाजी करत ८८ चेंडूत ९१ धावा फटकावल्या. पंतला पुन्हा एकदा शतकाने हुलकावणी दिली. तर, दुसरीकडे एका खास विक्रमासाठी त्याचे नाव इतिहासात नोंदवले गेले
हेही वाचा - खुशखबर..! भारत-इंग्लंड कसोटी सामन्याची आजपासून मिळणार तिकिटे
भारतात खेळताना पंत तिसऱ्यांदा शतक करण्यात अपयशी ठरला. पंतने आपल्या खेळीत ९ चौकार आणि ५ षटकार ठोकले. इंग्लंडच्या डोमिनिक बेसने पंतला पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला. यापूर्वी, २०१८च्या सुरुवातीला पंतने वेस्ट इंडिज विरुद्ध भारतीय भूमीवर पहिला सामना खेळला होता. या मालिकेच्या दोन्ही सामन्यांमध्ये पंत ९२ धावांवर बाद झाला.
सौराष्ट्रमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत पंतने ८४ चेंडूंचा सामना करत ९२ धावा केल्या. तर हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या दुसर्या कसोटी सामन्यात त्याने १३४ चेंडूंत ९२ धावा ठोकल्या होत्या.
कसोटी क्रिकेटमध्ये जलद अर्धशतक
चेन्नईतील कसोटी भारत संकटात असताना पंतने अवघ्या ४० चेंडूवर अर्धशतक पूर्ण केले. या कारनाम्यामुळे तो कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्यांच्या यादीत पोहोचला आहे. भारतीय संघाचे पूर्व कर्णधार कपिल देव हे या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांनी १९८२ साली पाकिस्तान संघाविरुद्ध खेळताना कराची मध्ये अवघ्या ३० चेंडूमध्ये अर्धशतक झळकावले होते. दुसऱ्या क्रमांकावरील विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने इंग्लंड संघाविरुद्ध ३२ चेंडुमध्ये अर्धशतक झळकावले होते. या यादीत पंतला तिसरे स्थान मिळाले आहे.