चेन्नई - भारतीय कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडच्या फलंदाजांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दुसर्या डावात धावा घेताना इंग्लंडच्या फलंदाजाच्या खेळपट्टीवर धावण्याबाबत विराटने पंच नितीन मेनन यांच्याकडे तक्रार केली. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चेन्नईतील चेपॉक मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना पार पडला. यात पाहुण्या इंग्लंडने भारताला २२७ धावांनी मात देत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
हेही वाचा - IND vs ENG : अजिंक्यला संघातून वगळणार का? प्रश्नावर विराट संतापला, म्हणाला...
इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत होता, तेव्हा विराटने मैदानावरील पंच नितीन मेनन यांच्याकडे तक्रार केली. ''मेनन, फलंदाज खेळपट्टीच्या मधोमध धावत आहे, हे काय आहे?'', असे विराटने म्हटले. स्टम्प्स माईकमध्ये विराटचे बोलणे ऐकले गेले.
चेन्नईतील पराभवावरही विराटने प्रतिक्रिया दिली. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत तो म्हणाला, ''संघाची बॉडी लँग्वेज बरोबर नव्हती शिवाय, आमच्यात आक्रमकता नव्हती. दुसर्या डावात आम्ही बरेच चांगले होतो. पहिले चार फलंदाज वगळता आम्ही पहिल्या डावाच्या उत्तरार्धात अधिक चांगले होतो. लवकरात लवकर सुधारणा करणे गरजेचे आहे. संपूर्ण सामन्यात इंग्लंडचा संघ आमच्यापेक्षा अधिक व्यावसायिक पद्धतीने खेळला.''
चेन्नईत पाहुण्यांचा मोठा विजय -
इंग्लंडने चेन्नई कसोटीतील पहिल्या डावात ५७८ धावांचा डोंगर उभारला. तेव्हा भारतीय संघ पहिल्या डावात ३३७ धावांवर सर्वबाद झाला. यात इंग्लंड संघाला मोठी आघाडी मिळाली त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी ४२० धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ १९२ धावांत ऑलआऊट झाला आणि इंग्लंडने हा सामना २२७ धावांनी जिंकला.