अहमदाबाद - नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या तिसर्या दिवशी इंग्लंडला भारताने एक डाव आणि २५ धावांनी पराभूत करून मालिका ३-१ अशी जिंकली. हा भारताचा घरच्या मैदानावरील सलग १३वा कसोटी मालिकाविजय होता.
२०१३मधील कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर ४-० असे हरवले होते. त्यापासून भारताने पाकिस्तानला सोडून घरच्या मैदानात आठ संघांना हरवले आहे. २०१३पासून भारताने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला दोन वेळा घरच्या मैदानावर पराभूत केले आहे. तर, २०१२-१३मध्ये इंग्लंडने भारताला भारतात २-१ असे हरवले होते.
घरच्या मैदानावर सलग सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्यात ऑस्ट्रेलिया दुसर्या क्रमांकावर आहे. १९९४ ते २००१ आणि २००४ ते २००८ या काळात ऑस्ट्रेलियाने दोनदा सलग १० कसोटी मालिका जिंकल्या आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकाविजयासोबत भारतीय संघाने, आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वलस्थान काबीज करत स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील आपला प्रवेश निश्चित केला. १८ जूनला लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर भारत-न्यूझीलंड असा अंतिम सामना रंगणार आहे.
हेही वाचा - रोड सेफ्टी सीरिज : श्रीलंकेची वेस्ट इंडिजवर ५ गडी राखून मात