नवी दिल्ली - भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याद्वारे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध कोण खेळणार, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, हा कसोटी सामना भारतीय सलामीवीर रोहित शर्मासाठी खूप खास ठरला. पहिल्या डावातील ४९ धावांच्या जोरावर रोहितने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या रोहितने १४४ चेंडूत ४९ धावा केल्या. सलामीवीर म्हणून त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत १००० धावा पूर्ण केल्या आहेत. रोहितव्यतिरिक्त कोणत्याही सलामीवीराला या स्पर्धेत आतापर्यंत इतक्या धावा करता आलेल्या नाहीत.
एकूण फलंदाजांच्या यादीत रोहित सहाव्या क्रमांकावर आहे. भारतीय फलंदाजांचा विचार केला तर रोहितपुढे उपकर्णधार अजिंक्य रहाणे या यादीत आधीच समाविष्ट झाला आहे. रहाणेच्या चौथ्या कसोटीपूर्वी १०५० धावा होत्या.
आतापर्यंतच्या एकूण धावांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा युवा स्टार फलंदाज मार्नस लाबुशेन १६७५ धावांसह अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट १६३० धावांसह दुसर्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या १३४१ धावांसह क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर इंग्लंडचा बेन स्टोक्स आहे. अजिंक्य रहाणे पाचव्या तर रोहित सहाव्या स्थानी आहे.
हेही वाचा - विराट कोहलीची धोनीच्या 'लाजिरवाण्या' कामगिरीशी बरोबरी