चेन्नई - डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल हा पदार्पणाच्या कसोटी सामन्यात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेणारा सहावा भारतीय फिरकीपटू ठरला आहे. चेपॉक स्टेडियमवर झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत अक्षरने भन्नाट कामगिरी केली. सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने ६० धावा देऊन पाच बळी घेतले. या सामन्यात इंग्लंडला ३१७ धावांनी पराभूत करत भारताने इंग्लंडविरुद्धचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय नोंदविला. यासह चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी साधली आहे.
अक्षरच्याआधी पाच भारतीय फिरकी गोलंदाजांनी पदार्पणाच्या कसोटीत पाच किंवा त्याहून अधिक बळी घेण्याची किमया साधली आहे. व्ही. व्ही. कुमार हे पदार्पणाच्या कसोटी सामन्यात पाच बळी घेणारे भारताचे पहिले फिरकीपटू होते. १९६०-६१ मध्ये कुमार यांनी दिल्लीत पाकिस्तानविरुद्ध ६४ धावा देऊन पाच बळी घेतले. त्याच्यानंतर दिलीप दोशी यांनी १९७९-८० मध्ये चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०३ धावा देऊन सहा बळी घेतले.
१९८७-८८मध्ये चेन्नई येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या डावात नरेंद्र हिरवानी यांनी ६१ धावा देऊन आठ बळी घेतले होते. दुसऱ्या डावातही त्यांनी ७५ धावा देऊन आठ विकेट्स घेतल्या. अमित मिश्राने २०११-१२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहालीमध्ये ४७ धावा देऊन पाच बळी घेतले होते.
भारताचा स्टार ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विननेही पदार्पण कसोटीत पाच बळी मिळवले आहेत. अश्विनने २०११-१२मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध दिल्लीमध्ये ४७ धावा देऊन सहा विकेट घेत हा पराक्रम केला होता.