नवी दिल्ली - इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन भारताविरुद्ध होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. करन आता थेट मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी संघात उपलब्ध असणार आहे. इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) गुरुवारी याची माहिती दिली. ४ फेब्रुवारीपासून उभय संघात चौथा कसोटी सामना सुरू होईल.
वाहतुकीशी संबंधित समस्येमुळे करन नियोजित वेळापत्रकानुसार भारतात येऊ शकणार नाही. ईसीबीने म्हटले आहे की, २६ फेब्रुवारीला करन मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी इंग्लंड संघात पुन्हा सामील होणार असून तो चार्टर विमानाने इतर सदस्यांसोबत येईल. भारतासह मालिका संपल्यानंतर करन आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळेल.
तिसऱ्या कसोटीसाठी मोईन अलीला वगळले -
भारत आणि इंग्लंड यांच्यात २४ फेब्रुवारीपासून तिसरा कसोटी सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने आपला १७ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या संघामधून अष्टपैलू खेळाडू मोईन अली याला वगळण्यात आले आहे. इंग्लंडने तिसऱ्या सामन्यासाठी जॉन बेअरस्टो याची संघात निवड केली आहे. त्याच्या व्यतिरिक्त जोफ्रा आर्चरही संघात पुनरागमन करणार आहे. दुखापतीमुळे त्याला दुसऱ्या सामन्याला मुकावे लागले होते. आर्चरशिवाय सलामीवीर झॅक क्रॅवली याचाही समावेश संघात आहे. त्याला दुखापतीमुळे पहिल्या दोन सामन्यांना मुकावे लागले होते.