मुंबई - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आयपीएलचा १४वा हंगाम स्थगित करण्यात आला. आता स्पर्धेतील उर्वरित सामने कुठे खेळवले जाणार याविषयी चाचपणी सुरू आहे. मात्र, आता पुढे होणाऱ्या सामन्यांमध्ये इंग्लंडचे क्रिकेटपटू खेळणार नाही, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
आयपीएलचा शिल्लक राहिलेला हंगाम या वर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये खेळवला जाण्याची दाट शक्यता आहे. या काळात इंग्लंडचे खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यात बिझी होणार आहेत. इंग्लंडचा संघ याकाळात पाकिस्तान आणि बांगलादेश विरुद्ध मालिका खेळणार आहे. यामुळे ते आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे संचालक ऍशले जाईल्स यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.
आयपीएलचा चौदावा हंगाम पूर्णपणे रद्द झाल्यास बीसीसीआयला २५०० कोटींचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे बीसीसीआय आयपीएलचे उर्वरित ३१ सामने कोणत्याही परिस्थितीत खेळण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी श्रीलंका, युएई व इंग्लंड असे पर्याय समोर आहेत.
दरम्यान, आयपीएलमध्ये इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, लियाम लिव्हींगस्टोन, जेसन रॉय, मोईन अली, सॅम बिलिंग्स, ख्रिस वोक्स, टॉम करन व सॅम करन यांचा समावेश आहे.
हेही वाचा - भारतीय संघाचे श्रीलंका दौऱ्यातील सर्व सामने 'या' मैदानावर होणार
हेही वाचा - चहर आणि कौल यांनी टोचून घेतली कोरोना प्रतिबंधक लस