ओवल - भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना लंडनच्या ओवल मैदानावर रंगला आहे. भारतीय संघाने या सामन्यातील दुसऱ्या डावात आश्वासक सुरूवात केली. सलामीवीर रोहित शर्माच्या शतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या दिवशी चहापानापर्यंत 1 बाद 199 धावा केल्या आहेत.
रोहित शर्माचे दमदार शतक -
रोहित शर्माने चौथ्या कसोटीतील दुसऱ्या डावात सुरूवातीला संयमी खेळ केला. पण जम बसल्यानंतर त्याने फटकेबाजी केली. रोहितने मोईन अलीला खणखणीत षटकार खेचत शतक पूर्ण केले. तो सलामीवीर म्हणून तीनही फॉरमॅटमध्ये इंग्लंडमध्ये शतक करणारा जगातील पहिला परदेशी फलंदाज ठरला. याशिवाय त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजार तसेच सलामीवीर म्हणून ११ हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला.
रोहित शर्माला चेतेश्वर पुजाराने चांगली साथ दिली. तो 97 चेंडूत 48 धावांवर नाबाद राहिला. रोहित-पुजारा जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 116 धावांची नाबाद भागिदारी रचली. भारताकडे 100 धावांची आघाडी झाली आहे. भारत या डावात किती धावांची आघाडी घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्याची मालिका खेळवली जात आहे. उभय संघातील मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत होत आहे. पहिला सामना पावसामुळे ड्रॉ झाला. तर लॉर्ड्स येथील दुसरा सामना भारताने 151 धावांनी जिंकला. यानंतर लीड्स येथील तिसरा कसोटी सामना 1 डाव 76 धावांनी जिंकत इंग्लंड संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
आता दोन्ही संघ चौथा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्यासाठी उत्सुक आहेत. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने या सामन्यात नाणेफक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. इंग्लंडच्या वेगवान माऱ्यासमोर भारताचा पहिला डाव 191 धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावा करत 99 धावांची आघाडी घेतली.
हेही वाचा - विराटने सचिन-पाँटिंगसह दिग्गजांना टाकलं मागे, जाणून घ्या कोहलीची कामगिरी
हेही वाचा - ENG vs IND : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीविषयी उमेश यादवची मोठी प्रतिक्रिया