ओवल - भारतीय क्रिकेट संघाने चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात, यजमान इंग्लंड संघाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारताने तिसऱ्या दिवसाच्या उपहारापर्यंत 1 बाद 108 धावा केल्या आणि 9 धावांची आघाडी मिळवली. उपहारापर्यंत रोहित शर्मा 47 तर चेतेश्वर पुजारा 14 धावांवर नाबाद होता. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला एकमात्र विकेट मिळाली.
भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाच्या खेळाला बिनबाद 43 वरून सुरूवात केली. रोहित शर्मा आणि के एल राहुल या जोडीने भारताचा डाव पुढे नेला. दोन्ही खेळाडूंनी चांगले फटके मारत इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. रोहित-राहुल जोडीने 83 धावांची सलामी दिली. त्यांची जोडी जेम्स अँडरसन याने फोडली. त्याने राहुलला जॉनी बेयरस्टो करवी झेलबाद केले. राहुलने 101 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारासह 46 धावांची खेळी साकारली.
इंग्लंडच्या चौकडीचा समाचार
के एल राहुल बाद झाल्यानंतर अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी मैदानात उतरला. रोहित-पुजारा जोडीने इंग्लंड गोलंदाजीचा यशस्वी सामना केला. दोघांनी इंग्लंडच्या जेम्स अँडरसन, ओली रॉबिन्सन, ख्रिस वोक्स आणि क्रेग ओवरटन या चौकडीचा धैर्याने सामना केला. उपहारापर्यंत भारताने 1 बाद 108 धावा केल्या आहेत. भारतीय संघाकडे 9 धावांची आघाडी झाली आहे. रोहित आणि चेतेश्वर पुजाराची जोडी नाबाद आहे.
दरम्यान, भारतीय संघ पहिल्या डावात 191 धावांत सर्वबाद झाला. तेव्हा इंग्लंडने 290 धावा करत पहिल्या डावात 99 धावांची आघाडी मिळवली होती.
हेही वाचा - IND vs ENG: जेम्स अँडरसनने सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला विश्वविक्रम
हेही वाचा - ENG vs IND : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीविषयी उमेश यादवची मोठी प्रतिक्रिया