ओवल - भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्याच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना ओवलच्या मैदानावर खेळला जात आहे. भारताने चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात चहापानापर्यंत 8 बाद 445 धावा केल्या आहेत. भारताकडे 346 धावांची आघाडी झाली आहे.
शार्दुल ठाकूर आणि ऋषभ पंत या जोडीने भारताला मोठी आघाडी मिळवून दिली. दोघांनी सातव्या गड्यासाठी 115 धावांची भागिदारी केली. यात शार्दुल ठाकूरने 72 चेंडूत 60 धावांची खेळी साकारली. तर ऋषभ पंतने 106 चेंडूत 50 धावांचे योगदान दिले. जो रूटने क्रेग ओव्हरटन करवी ठाकूरला बाद केले. तर मोईन अलीने पंतची खेळी संपुष्टात आणली.
पंत-ठाकूरची जोडी माघारी परतल्यानंतर जसप्रीत बुमराह आणि उमेश यादवने किल्ला लढवला. दोघांनी नवव्या गड्यासाठी नाबाद 31 धावांची भागिदारी केली. बुमराह 19 तर उमेश यादव 13 धावांवर खेळत आहे. भारताने चहापानापर्यंत 8 बाद 445 धावा केल्या असून भारताकडे 346 धावांची आघाडी झाली आहे.
भारताने आज 3 बाद 270 धावांवरुन पुढे खेळण्यास सुरूवात केली. रविंद्र जडेजाला पायचित करत ख्रिस वोक्सने भारताला चौथा धक्का दिला. जडेजाने 17 धावा केल्या. यानंतर भारताला अजिंक्य रहाणेच्या रुपाने मोठा झटका बसला. ख्रिस वोक्सने त्याच्या पुढील षटकात अजिंक्य रहाणे पायचित केलं. त्याला भोपळाही फोडता आला नाही.
विराट कोहलीने ऋषभ पंतच्या साथीने भारतीय संघाला तीनशेचा टप्पा पार करून दिला. विराट कोहली मोठी खेळी करणार असे वाटत असताना तो मोईन अलीच्या फिरकी जाळ्यात अडकला. मोईन अलीच्या चेंडूवर क्रेग ओव्हरटन याने पहिल्या स्लिपमध्ये विराटचा झेल घेतला. विराट कोहलीने 96 चेंडूत 7 चौकारांसह 44 धावांची खेळी केली.
संक्षिप्त धावफलक -
- भारत पहिला डाव (191 सर्वबाद)
- इंग्लंड पहिला डाव (290 सर्वबाद)
- भारत दुसरा डाव (चहापानापर्यंत 8 बाद 445 रोहित शर्मा 127, चेतेश्वर पुजारा 61, के एल राहुल 46, विराट कोहली 44, शार्दुल ठाकूर 60, ऋषभ पंत 50 ऑली रॉबिन्सन 105/2)
हेही वाचा - सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह करतोय ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची सफर
हेही वाचा - England vs india : उपहारापर्यंत भारताच्या 6 बाद 329 धावा, पंत-ठाकूर जोडी मैदानात