लंडन - नेटमध्ये सराव करताना इंग्लंडच्या २४ वर्षीय क्रिकेटपटू जोशुआ डाउनी याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जोशुआ डाउनीच्या अचानक झालेल्या निधनाने त्याच्या चाहत्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
नॉटिंगहॅमशायरचा खेळाडू जोशुआ डाउनी नेटमध्ये सराव करत होता. तेव्हा त्याला ह्रदयविकाराचा झटका आला. तेव्हा जोशुआला सीपीआर देण्यात आला, मात्र तो वाचू शकला नाही. खाली कोसळल्यानंतर जोशुआला रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र त्याला मृत घोषित करण्यात आले. जोशुआ हा ऑलिम्पिक जिम्नॅस्ट बेकी डाउनी आणि एली डाउनी यांचा भाऊ होता.
'२४ वर्षाच्या जोशुआ डाउनीच्या निधनाची बातमी ऐकून एनपीएलमधील प्रत्येकजण धक्क्यात आहे. या कठीण काळात आम्ही जोशुआच्या कुटुंबीयांसोबत आहोत. जोशुआच्या घरच्यांना या घटनेने मोठा धक्का बसला आहे, असे नॉटिंगहॅमशायर क्रिकेट बोर्ड प्रीमियर लीगने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
जोशुआचे वर्तन आणि व्यक्तिमत्त्व सुंदर होते. मला त्याची नेहमी आठवण येईल. तो अचानक खाली कोसळला आणि पुन्हा उठलाच नाही. पदवी संपादन केल्यानंतर तो मागील वर्षी सप्टेंबरमध्ये नवीन नोकरीसाठी येथे आला होता. जुलैमध्ये तो २५ वर्षाचा होणार होता. तो आता गेला आहे हे खरे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया जोशुआची आई हेलन यांनी दिली.
हेही वाचा - चहर आणि कौल यांनी टोचून घेतली कोरोना प्रतिबंधक लस
हेही वाचा - 'श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार भुवी किंवा धवनला केलं जाऊ शकतं'