लंडन - विश्वकरंडक स्पर्धेला काही तासांचा अवधी उरला असतानाच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. क्रिकेटची पंढरी म्हणजे लॉर्ड्सच्या मैदानावर विराटच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. हे अनावरण मेणाच्या पुतळ्यांसाठी प्रसिद्ध असणाऱया मादाम तुसाँने केले आहे. विराटचा हा पुतळा १५ जुलैपर्यंत मादाम तुसाँमध्ये ठेवण्यात येणार आहे.
पुढील काही आठवडे संपूर्ण देशभरात क्रिकेटचा फिव्हर असणार आहे. यामुळे आमचे शेजारी लॉर्ड्सच्या मदतीने विराट कोहलीच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची यापेक्षा चांगली संधी नव्हती’, असे मादाम तुसाँ लंडनचे महाव्यवस्थापक स्टीव्ह डेव्हिस यांनी सांगितले.
डेव्हिस म्हणाले, ‘आम्हाला आशा आहे, क्रिकेटचे चाहते मैदानात आपल्या हिरोला फक्त खेळताना पाहून आनंद घेणार नाहीत, तर मादाम तुसाँमध्ये त्यांच्यासोबत क्रीज शेअर करतील’.
विराट कोहलीचा पुतळा भारतीय संघाच्या जर्सीमध्ये आहेत. या पुतळ्यासाठी वापरलेले शूज आणि ग्लोव्हज विराट कोहलीचे आहेत. मादाम तुसाँमध्ये विराट कोहलीचा पुतळा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शेजारी ठेवण्यात येणार आहे