लंडन - विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारताचा आज न्यूझीलंडविरूद्ध पहिला सराव सामना रंगणार आहे. पण त्याआधी भारतीय संघाच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण नेटमध्ये सराव करताना भारताचा एक अष्टपैलू खेळाडू जखमी झाला आहे.
विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघात प्रथमच स्थान देण्यात आलेल्या विजय शंकरला नेटमध्ये फलंदाजी करताना दुखापत झाली. हाताला झालेल्या दुखापतीमुळे शंकरला वेदना होत होत्या. ही दुखापत कितपत गंभीर आहे हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन आणि फिजीओच्या नजरा शंकरच्या दुखापतीकडे लागल्या आहेत.
विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर कोणाची निवड होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. परंतु, विजय शंकरची सध्याची कामगिरी पाहता त्याला संघात स्थान देण्यात आले.
आज होणाऱ्या सराव सामन्यानंतर भारतीय संघाचा बांग्लादेशबरोबर अजून एक सराव सामना होणार आहे. विश्वकप स्पर्धेत भारताचा पहिला सामना ५ जूनला आफ्रिकेविरुद्ध होईल.