मुंबई - आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताला न्यूझीलंडकडून १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाने भारतीयांचे विश्वकरंडक जिंकण्याचे स्वप्न उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. आता टीम इंडियाचे पुढील लक्ष वेस्ट इंडिज असणार आहे. टीम इंडिया विंडीज दौऱ्यावर दोन कसोटी व प्रत्येकी तीन एकदिवसीय व ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यापैकी एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात येणार आहे.
विंडीजविरुद्धच्या मालिकेत कर्णधार विराट कोहली आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोहितकडे एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 संघाचे नेतृत्व दिले जाणार आहे. तर अजिंक्य रहाणेकडे कसोटीचे कर्णधारपद दिले जाऊ शकते.
विंडीजविरुद्धच्या 3 ते 8 ऑगस्ट या कालावधीत टी-20 मालिका होईल. त्यानंतर 8 ते 14 ऑगस्ट या कालावधीत तीन एकदिवसीय आणि 22 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. यंदाच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत तुफान फॉर्मात असलेल्या हिटमॅन रोहित शर्माला सचिनचा सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम मोडण्यासाठी अवघ्या २६ धावा कमी पडल्या. त्यामुळे हा विक्रम गाठण्यासाठी त्याला आता पाच वर्षे वाट पाहावी लागणार आहे.