मॅनचेस्टर - विश्वचषकात पाकिस्तानची भारताकडून होणाऱ्या 'धुलाई'ची परंपरा या स्पर्धेतही कायम राहिली आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळविला. या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आणि संघाला अनेकांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे. शिवाय, पाक कर्णधार सरफराज अहमदलादेखील प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले आहे. पण, सरफराजने देखील आता आपली बाजू मांडली आहे.
पाकिस्तानच्या स्थानिक वृत्तपत्रानुसार, सरफराजने आपल्या संघसहकाऱ्यांना इशारा दिल्याचे समजत आहे. विश्वकरंडक स्पर्धेतील आपली कामगिरी उंचावली नाही तर, मी एकटाच मायदेशी परत जाणार नाही आहे. माझ्यासोबत संपूर्ण संघ असणार आहे. त्यामुळे वेळीच खेळ सुधारा, असा इशारा त्याने पाकिस्तानच्या खेळाडूंना दिला आहे.
भारताने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला. या सामन्यात सोशल मीडियावर पाकिस्तानच्या खेळाडूंना ट्रोल करण्यात आले. काही पाकिस्तानी चाहत्यांनी तर खेळाडूंना शिवीगाळ केल्याचेही समोर आले आहे. यामध्ये प्रामुख्याने कर्णधार सर्फराज अहमद, शोएब मलिक याच्यावर चाहत्यांचा रोष आहे. रावळपिंडी एक्स्प्रेस समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानेही आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत पाकिस्तानच्या संघावर ताशेरे ओढले आहेत. त्याने सरफराजला 'बिनडोक' कर्णधार म्हटले होते.