बर्मिंगहॅम - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानने ६ बळी राखून विजय मिळवला. न्यूझीलंडने दिलेले २३८ धावांचे आव्हान पाकने बाबर आझम (नाबाद १०१ धावा) शतकी खेळी आणि हरिस सोहेलच्या ६८ धावांच्या मदतीने पूर्ण केले. सध्याच्या घडीचा पाकिस्तानतचा सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळख असलेला बाबर हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३००० धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. असे करताना त्याने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीला मागे टाकले आहे.
बाबरने ६८ डावांमध्ये तीन हजार धावांचा पल्ला गाठला आहे. या डावांमध्ये बाबरने ९ शतक आणि १४ अर्धशतके झळकावली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३००० धावांचा विक्रम हा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हशिम अमलाच्या नावावर आहे. त्याने ५७ इनिंगमध्ये हा विक्रम रचला होता.
न्यूझीलंड विरुध्दच्या सामन्यात २३८ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात चांगली नाही. सलामीवीर फखर झमान संघाच्या १९ धावा झाल्या असताना बाद झाला. त्यानंतर पुन्हा इमाम उल हक दहाव्या षटकात संघाची धावसंख्या ४४ असताना बाद झाला. यानंतर मात्र, मोहम्मद हाफिज आणि बाबर आझम याने संघाची पडझड रोखली. मोहम्मद हाफिज वैयक्तिक ३२ धावा करून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या हरिस सोहेल आणि बाबर आझम या दोघांनी भागिदारी रचत पाकच्या विजयाचा मार्ग सुकर केला.