ख्राईस्टचर्च - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला शनिवारपासून सुरुवात होत आहे. मात्र, या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ या सामन्यासाठी उपलब्ध असणार का? ही शंका व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा - आयपीएलपूर्वी केकेआरला मोठा धक्का, 'महत्वाचा' खेळाडू स्पर्धेबाहेर
पृथ्वीच्या डाव्या पायाला सूज आल्याने त्याने गुरुवारी सराव सत्रात भाग घेतला नाही. त्यांची रक्त तपासणी केली गेली असून त्याच्या बद्दल शुक्रवारी निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे पृथ्वी या सामन्यात खेळू शकला नाही तर, शुबमन गिलला संधी मिळू शकते.
शुबमन गिलने गुरुवारी सरावात भाग घेतला. या दरम्यान टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री त्याचे बारकाईने निरीक्षण करत होते. सरावानंतर गिल आणि शास्त्री यांनी चर्चाही केली. काही काळ विराट कोहलीही त्यांच्यासोबत होता. पहिली कसोटी गमावल्यामुळे दुसरी कसोटी टीम इंडियासाठी महत्त्वाची असणार आहे.
पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये भारताला २०० धावांचा टप्पा गाठता आला नाही. टीम इंडियाने शेवटच्या सहा कसोटी मालिका जिंकल्या आहेत. दुसरीकडे घरच्या मैदानावर न्यूझीलंडची कामगिरी नेत्रदीपक ठरली आहे. वेगवान गोलंदाज टिम साउथी आणि ट्रेंट बोल्ट यांनी कसोटीत चांगली कामगिरी केली आहे. वेगवान गोलंदाज नील वॅगनर संघात परतल्यामुळे न्यूझीलंडचा संघ 'बळकट' वाटत आहे.