कालाहंडी - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत काल भारत विरुद्ध न्यूझींलड असा उपांत्य फेरीचा सामना झाला. न्यूझीलंड संघाने चांगली कामगिरी करताना बलाढ्य आणि प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाला १८ धावांनी पराभूत केले. संपूर्ण स्पर्धेत चांगला खेळ केल्यानंतर पराभव झाल्यामुळे भारतीय संघाच्या चाहत्यांची घोर निराशा झाली. याच निराशेतून ओडिशातील युवकाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर, बिहारमध्ये सामना बघताना ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
समबारू भोई (राहणार, सिंगलबादी गोलामुंदा ब्लॉक, जिल्हा कालाहंडी) या २२ वर्षीय युवकाने त्याच्या मित्रांसोबत भारत-न्यूझीलंड सामन्यासाठी शर्यत लावली होती. न्यूझीलंडने सामना जिंकल्यामुळे तो शर्यंत हरला. भारत हरल्यामुळे तो निराश झाला. या निराशेत त्याने शेतामध्ये जाऊन विष घेतले. त्याचे कुटुंब सकाळी शेतात पोहोचल्यानंतर तो बेशुद्धावस्थेत त्यांना सापडला. यानंतर, घरच्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याला प्रथम धरमगढ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती बिघडल्यानंतर त्याला भवानीपुरा जिल्ह्यातील रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती सध्या ठिक असून पोटातून विष बाहेर काढल्याची माहिती, मुख्य वैद्यकीय अधिकारी बनालता देवी यांनी दिली आहे.
बिहारमध्ये किशनगंज येथेल राहणारा व्यक्तीला भारत-न्यूझीलंड सामना पाहताना ह्रदयविकाराचा झटका आला. श्वसनाचा त्रास होते असलेला पाहुन कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु, रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. तो मन लावून भारत-न्यूझीलंडचा सामना बघत होता. परंतु, भारताचा पराभवामुळे त्याला ह्रदयविकाराचा झटका आल्याची माहिती कुटुंबाने दिली आहे.