बर्मिंगहॅम - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ चा २५ वा सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघात बर्मिंगहॅमच्या मैदानावर रंगला. या सामन्यात एक आश्चर्यचकित गोष्ट घडली. न्यूझीलंड संघाच्या गोलंदाजीमध्ये कर्णधार विलियम्सनने अष्टपैलू खेळाडू जिमी निशामला संपूर्ण डावात एकही षटक टाकायला दिले नाही. या प्रकारामुळे निशामने विलियम्सनला गमतीने इंस्टाग्रामवर मजेदार पोस्ट टाकत लक्ष्य केले आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये निशामने म्हटले आहे, 'जेव्हा तुम्हाला कळते की निशामला गोलंदाजी द्यायला तुम्ही पूर्ण विसरुन गेला आहात. पण खरंच हा माणूस बरा आहे?!?!'. या पोस्टवर विलियम्सलादेखील हसू आवरले नाही. यापूर्वीच्या अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात निशामने ५ बळी घेतले होते!
या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. मात्र, हाशिम आमला आणि मधल्या फळीतल्या फलंदाजांनी डाव सावरल्यामुळे दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला २४१ धावांचे लक्ष दिले. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या २४२ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने संयमी शतकी खेळी करून नाबाद १०३ धावा केल्या. तर मधल्या फळीतील कॉलिन डी-ग्रँडहोमने ६० धावा काढत त्याला चांगली साथ दिली. त्यांच्या भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने हा सामना जिंकला.