मुंबई- आयसीसीच्या पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळविण्यासाठी तब्बल २१ वर्ष न्यूझीलंडला झगडावे लागले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात त्यांनी टीम इंडियाचा ८ गडी राखून पराभव केला. अखेरच्या दिवशी टीम इंडियाची फलंदाजी असमाधानकारक राहिली. दुसर्या डावात टीम इंडियाला फक्त १७० धावांचे आव्हान उभारता आले. त्या आव्हानाला प्रत्युत्तर देत न्यूझीलंडने दोन गडी गमावत १३९ धावांचे लक्ष्य गाठले. टीम इंडियाने पहिल्या डावात २१७ धावा केल्या, तर न्यूझीलंडने २४९ धावा केल्या. आयसीसीतर्फे प्रथमच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पहिली कसोटी १८७७ मध्ये खेळली गेली.
२१ वर्षांच्या संघर्षानंतर न्यूझीलंडला मिळाली आयसीसीची ट्रॉफी
२१ वर्षांच्या संघर्षानंतर न्यूझीलंडच्या संघाने आयसीसीचे विजेतेपद जिंकले आहे. २००० साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभूत केले होते. टीम इंडियाने प्रथम खेळत ६ बाद २६४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडने ४ गडी आणि २ चेंडू राखून हे लक्ष्य गाठले. ख्रिस केर्न्सने नाबाद १०२ धावा केल्या होत्या.