कार्डिफ - सोफिया मैदानावर विश्वकरंडक स्पर्धेत आज तिसरा सामना होणार आहे. या सामन्यामध्ये तगड्या न्यूझीलंडसमोर नवख्या श्रीलंकेचे आव्हान असेल. २०१५ च्या विश्वकरंडक स्पर्धेत केलेल्या प्रदर्शनाची पुनरावृत्ती करण्याचा न्यूझीलंड संघाचा मानस असेल. आजचा सामना सायंकाळी ६ वाजता सुरू होणार आहे.
भारताविरूद्ध झालेल्या पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडने धमाकेदार विजय मिळवला होता. तर, दुसऱ्या सराव सामन्यात त्यांना विंडीजकडून मात खावी लागली होती.
श्रीलंकेच्या संघाचा विचार करायचा झाल्यास, त्यांच्याकडे म्हणावे तसे आक्रमक फलंदाज नाहीत. चार वर्षांपूर्वी शेवटचा सामना खेळणाऱ्या दिमुथ करुणारत्नेकडे श्रीलंकेच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. मागील नऊपैकी आठ लढतीत श्रीलंकेला पराभव पत्करावा लागला होता. तरीही या कुसल परेरा, अँजेलो मॅथ्यूज, लसिथ मलिंगा असे काही नावाजलेले खेळाडू आहेत.
सामन्यातील प्रमुख आकर्षण -
केन विल्यमसन -
मायदेशात झालेल्या विश्वकप स्पर्धेत ब्रेंडन मॅक्क्युलमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर जागतिक क्रमवारीत न्यूझीलंडने दुसरे स्थान पटकावले आहे. संघ तोच असला तरी कर्णधारपद केन विल्यमसनच्या हाती सोपवण्यात आले आहे.
लसिथ मलिंगा -
'यॉर्कर स्पेशालिस्ट' लसिथ मलिंगाने २००७ साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चार चेंडूत चार विकेट घेत हॅट्ट्रिक साजरी केली होती. ३५ वर्षीय लसिथ मलिंगा सध्या भन्नाट फॉर्मात आहे. आयपीएलमध्ये मलिंगाने १६ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
न्यूझीलंडचा संघ -
- केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गुप्टील, रॉस टेलर, ट्रेंट बोल्ट, डी ग्रँडहोमे, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, कॉलिन मुनरो, जिमी निशाम, हेन्री निकोलस, मिशेल सँटेनर, ईश सोधी, टीम साऊदी, टॉम ब्लंडेल.
श्रीलंकेचा संघ -
- दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, थिसारा परेरा, कुशल परेरा, धनंजय डिसेल्वा, कुशल मेंडिस, आयसुरु उडाना, मिलींदा सिरिवर्धना, अविष्का फर्नांडो, जीवन मेंडिस, लाहिरु थिरिमन्ने, जेफ्री वंडरसे, नुवान प्रदीप, सुरांगा लकमल.