नवी दिल्ली - भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी महेंद्रसिंह धोनीच्या भारतीय संघातील समावेशाबद्दल वक्तव्य केले आहे. 'मी धोनीचा चाहता आहे आणि म्हणूनच त्याला यावर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकात खेळताना पाहायचे आहे, परंतु हा निर्णय संघ व्यवस्थापनाने घ्यावा', असे कपिल देव यांनी म्हटले.
हेही वाचा - अवघ्या १२ धावात घेतले १० बळी...पाहा व्हिडिओ
कपिल देव यांनी धोनी आणि इतर युवा क्रिकेटपटूंबद्दल मत व्यक्त केले. ते म्हणाले, 'संघात येण्यासाठी धोनीने जास्तीत जास्त सामने खेळले पाहिजेत अन्यथा इतर खेळाडूंवर अन्याय होईल. पण जर तो एक वर्ष खेळला नसेल तर आपण काय अपेक्षा करू शकता? त्याने अधिक सामने खेळायला हवेत. फक्त एकटा धोनी आयपीएल खेळत नाही. पुढील दहा वर्ष खेळू शकणार्या तरुण खेळाडूंची नवीन पिढी कोण आहे हे मी पाहतो. धोनीने यापूर्वीही देशासाठी बरेच योगदान दिले आहे. तो त्याच्या कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे.'
गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात धोनीने खेळपट्टीवर अखेरचे पाऊल ठेवले होते. धोनी आता इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी सत्रात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसणार आहे.
या हंगामाचा पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना २९ मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये रंगणार असून १७ मे रोजी अखेरचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येईल.