मँचेस्टर - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेच्या पहिल्याच उपांत्य सामन्यात पावसाने हजेरी लावली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 46.1 षटकात 5 बाद 211 धावा केल्या. यानंतर रात्री उशिरापर्यंत लढत सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे मंगळवारचा खेळ थांबवून उर्वरित खेळ राखीव दिवशी म्हणजे आज होणार असल्याचे पंचांनी जाहीर केले. या सामन्यात भारताचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीने खास विक्रम रचला आहे.
एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये 350 सामने खेळणारा धोनी हा दुसरा भारतीय फलंदाज बनला आहे. पहिल्या स्थानावर ४६३ सामन्यांसह सचिन तेंडुलकर विराजमान आहे. न्यूझीलंडविरुद्धचा उपांत्य सामना हा धोनीचा ३५० वा सामना होता. शिवाय, सलग यष्टीरक्षक म्हणून 350 एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रमही धोनीने आपल्या नावावर केला आहे. धोनी हा भारतीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याने एकूण २०० सामन्यांत कर्णधारपद भूषविले आहे. त्यापैकी ११० सामन्यांत भारत विजयी झाला आहे.
महेंद्रसिंह धोनीने 2007 साली टी-20 विश्वकरंडक, 2011ची एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा आणि 2013 सालची चॅम्पियन ट्रॉफी भारताला जिंकून दिली आहे. तिन्ही स्पर्धा जिंकणारा धोनी जगातला एकमेव कर्णधार आहे. धोनीने नेहमीच संघासाठी आपले योगदान देत विजयामध्ये महत्त्वाचा वाटा उचलला आहे.