मेलबर्न - ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडली आहे. सोमवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम साखळी सामन्यात पेरीला दुखापत झाली. या दुखापतीनंतर पेरीने मैदान सोडले होते.
हेही वाचा - FIH RANKING : तब्बल १७ वर्षानंतर भारतानं केली मोठी कामगिरी
सोमवारी जंक्शन ओव्हल मैदानावर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा चार धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश नोंदवला. या सामन्यादरम्यान न्यूझीलंडच्या फलंदाजाला धावबाद करताना एलिसला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली. 'या क्षणी सर्व पर्यायांचा विचार केला आहे. एलिसला दुखापतीतून सावरण्यासाठी आम्ही मदत करत आहोत', असे संघाच्या डॉक्टरांनी सांगितले आहे.
ऑस्ट्रेलियाने पेरीच्या जागी कोणत्याही खेळाडूचे नाव जाहीर केलेले नाही. 'एलिस ही आमच्या संघाची मुख्य सदस्य आहे. आम्ही ती बाहेर पडल्यामुळे खूप निराश आहोत', असे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांनी म्हटले आहेत.