लंडन - विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना रोमांचक ठरला. हा सामना सुपर ओव्हरमध्येही अनिर्णित राहिल्याने सर्वाधिक चौकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आले. यानंतर आयसीसीच्या सुपर ओव्हरच्या 'जाचक' नियमावर जगभरातून राग व्यक्त करण्यात आला. या नियमावर सचिन तेंडुलकरनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
विश्वकरंडक क्रिकेटच्या अंतिम सामन्याप्रमाणे इतर सामन्यातही सुपर ओव्हर टाय झाल्यावर, आणखी सुपर ओव्हर खेळवण्यात यावी, असे सचिनने म्हटले आहे. ज्या प्रकारे फुटबॉल सामन्यात अतिरिक्त वेळ दिली जाते, तशीच पद्धत क्रिकेटमध्येही असावी, असेही सचिन म्हणाला.
भारताचे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर, युवराज सिंग आणि आकाश चोप्रा यांनी आयसीसीच्या चौकार आणि षटकाराच्या नियमाला फटकारले आहे. 'अंतिम सामन्याचा विजेता ठरवण्याबद्दल असलेला आयसीसीचा चौकार आणि षटकाराचा नियम अगदी वाईट आहे. सामना बरोबरीत सुटायला हवा होता.' असे गंभीरने आयसीसीला ट्विट करत म्हटले आहे.