नवी दिल्ली - विश्वकरंडक २०१९ स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. पराभवाबरोबरच भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दरम्यान, हा पराभव अद्यापही भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल विसरु शकलेला नाही. या सामन्याबद्दलच्या आपल्या कटू आठवणी चहलने सांगितल्या.
'माझी हा पहिली विश्वकरंडक स्पर्धा होती. जेव्हा धोनी धावबाद होऊन माघारी परतत होता. त्यावेळी मी फलंदाजीसाठी मैदानात जात होतो. मी स्वतःवर ताबा ठेवत मैदानात उतरलो. त्यावेळी माझ्या डोळ्यातून पाणी येणेच बाकी राहिले होते. ते वातावरण माझ्यासाठी खूप निराशजनक होते,' असे चहलने दिल्लीतील एका कार्यक्रमात सांगितले.
हेही वाचा - 'संघासाठी खडतर निर्णय घेणाऱ्या धोनीला निवृत्ती कधी घ्यायची कळतं'
पुढे बोलताना चहल म्हणाला, 'आम्ही संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली. पण, पावसावर आपण नियंत्रण मिळवू शकत नाही. याविषयी आणखी बोलणे योग्य ठरणार नाही. संपूर्ण स्पर्धेत पहिल्यांदाच शक्य तितक्या लवकर मैदानातून हॉटेलला परत जावे असे मला वाटत होते.'
दरम्यान, न्यूझीलंड विरुध्द झालेल्या उपांत्य सामन्यात भारताला २४० धावांचे लक्ष्य पार करता आले नव्हते. भारतीय संघाची अवस्था ६ बाद ९२ अशी होती. तेव्हा धोनीने रविंद्र जडेजासोबत ११६ धावांची भागिदारी करत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. मात्र, मार्टिन गुप्टीलच्या फेकीवर धोनी धावबाद झाला आणि अखेर भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला.
विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय संघाने वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळली. या दोन्ही मालिकांमध्ये चहलला विश्रांती देण्यात आली होती.
हेही वाचा - रोहित शर्माचे शतक 'इतक्या' धावांनी हुकले