नवी दिल्ली - 'सिक्सर किंग' युवराज सिंग याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, आता तो नवीन पारीची सुरूवात करत आहे. तो कॅनडातील ग्लोबल टी -२० लीग (जी -२०) स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. गुरुवारी जी २० च्या दुसऱ्या लिलावात टोरांटो नॅशनल टीमने युवराजला विकत घेतले.
युवराजने काही दिवसांपूर्वी कॅनडातील ग्लोबल जी टी -२० मध्ये खेळण्यासाठी बीसीसीआयकडे परवानगी मागितली होती, त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे तो या लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. युवराज या स्पर्धेत खेळणारा एकमेव भारतीय खेळाडू असणार आहे.
टोरांटो नॅशनल टीमने युवराजला किती रकमेला विकत घेतले याची माहिती समोर आली नाही. मात्र, या लीगमध्ये युवराज बरोबरच अनेक देशांचे नामवंत खेळाडू खेळणार आहेत. यात ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि वेस्टइंडिजच्या ख्रिस गेलसह इतर अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. याव्यक्तिरिक्त पाकिस्तानी खेळाडूही या लीगमध्ये खेळताना दिसतील.