सिडनी - बिग बॅश लीगमध्ये (बीबीएल) खेळणारा पहिला भारतीय खेळाडू होण्यासाठी युवराज सिंग प्रयत्नशील आहे. ऑस्ट्रेलियाच्या या प्रसिद्ध लीगमध्ये खेळण्यासाठी युवराज क्लबच्या शोधात आहे. शिवाय, यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) त्याला मदत करत असल्याचेही वृत्त आहे.
सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या अहवालानुसार, युवराजचे मॅनेजर जेसन वॉर्न यांनी ही माहिती दिली. "आम्ही सीएबरोबर एक क्लब शोधण्यासाठी काम करत आहोत", असे जेसन म्हणाले.
यावर्षी बीबीएलचा दहावा हंगाम खेळला जाईल. या लीगमध्ये एकाबी भारतीय खेळाडूला खेळता आलेले नाही. कारण निवृत्ती घेईपर्यंत बीसीसीआय खेळाडूंना आयपीएलबाहेरील विदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देत नाही.
निवृत्ती झालेला युवराज सध्या आयपीएलही खेळत नाही. म्हणूनच तो आता विदेशी लीग खेळण्यास मोकळा झाला आहे. त्याने ग्लोबल टी-२० लीग आणि अबु धाबी टी-१० लीगमध्ये भाग घेतला होता.
युवराजने १० जून २०१९ला राष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. युवराजने भारताकडून ३०४ एकदिवसीय सामने, ४० कसोटी आणि ५८ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे ८७०१, १९००, ११७७ धावा केल्या आहेत.