मुंबई - भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आणि डावखुरा फलंदाज युवराज सिंगबद्दल एक मोठी चर्चा करण्यात येत होती. युवी आणि त्याची पत्नी हेजल कीच एका वेब सीरिजमध्ये काम करणार असल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, युवराजनेच ही अफवा असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा - "सेहवागला पाकिस्ताननं मोठं केलं", रझाकचं नवीन वक्तव्य
'युवराजने त्याची पत्नी हेजल कीच आणि त्याचा छोटा भाऊ झोरावर सिंगसोबत एक वेब सीरिज साइन केली आहे. यात झोरावर मुख्य भूमिकेत दिसणार असून युवराजची आईसुद्धा लवकरच या वेब सीरिजशी जोडल्या जातील. ही वेबसीरिज आसामचा एक प्रॉडक्शन हाऊस 'ड्रीम हाऊस प्रोजक्शन्स' बनवणार आहे', असे वृत्त आले होते.
या बातमीला अर्धवट असल्याचे युवराजने ट्विटरवर सांगितले आहे. 'मी वेबसिरिजमध्ये पदार्पण करणार असल्याच्या वृत्ताद्दल काही गोष्टी सांगायच्या आहेत. या वेबसिरिजमध्ये माझा लहान भाऊ काम करणार आहे, मी नाही. मी मीडियामधील माझ्या सर्व सहकाऱ्यांना सांगू इच्छितो की याबद्दल सत्य पडताळून पहा. धन्यवाद', असे युवीने ट्विटमध्ये म्हटले आहे.
२००७ साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत युवराज सिंहने आक्रमक फलंदाजी केली होती. या स्पर्धेत त्याने इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला सहा चेंडूत सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे. २०११ च्या विश्वकरंडक स्पर्धेतही युवराजने मोलाची भूमिका पार पाडली आहे. युवराजने १० जून २०१९ ला आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषीत केली. युवराजने भारताकडून ३०४ एकदिवसीय सामने, ४० कसोटी आणि ५८ टी-२० सामने खेळले आहेत