नॉटिंगहॅम - आयसीसी विश्वचषक स्पर्धेमधील भारत विरुध्द न्यूझीलंड हा सामना पावसामुळे रद्द झाला आहे. यामुळे दोन्ही संघाला एक-एक गुण देण्यात आले. इंग्लडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकामध्ये भारत आणि न्यूझीलंड सामन्यापर्यंत ४ सामने रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये दक्षिण अफ्रिका-वेस्टइंडीज, श्रीलंका-पाकिस्तान, श्रीलंका-बांग्लादेश आणि आज भारत आणि न्यूझीलंडचा सामन्याचा समावेश आहे.
इंग्लडमध्ये होत असलेल्या विश्वचषकात ४ सामने रद्द करण्यात आले आहेत. तर नाणेफकही न होता रद्द होणारा या विश्वचषकातील आजचा तिसरा सामना आहे. त्यामुळे विश्वचषकाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे की एका विश्वचषक स्पर्धेत एकापेक्षा अधिक सामने एकही चेंडू न खेळता पावसामुळे रद्द झाले आहेत.
आज रद्द करण्यात आलेल्या भारत विरुध्द न्यूझीलंडच्या सामन्याआधी याच वर्षी सुरू असलेल्या विश्वचषकात ७ जूनला पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका या संघातील सामना आणि ११ जूनला बांगलादेश विरुद्ध श्रीलंका या संघातील सामना पावसामुळे नाणेफकही न होता रद्द झाला. तसेच याआधीच्या ११ विश्वचषक स्पर्धांमध्ये फक्त १९७० च्या विश्वचषकात श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज या संघातील सामना तर २०१५ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश या संघातील सामना पावसामुळे एकही चेंडूचा खेळ न होता रद्द झाला होता.
तर त्याचबरोबर २०१९साली झालेल्या विश्वचषकात १० जून रोजी झालेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिजचा सामनाही पावसामुळेच अनिर्णित राहिला होता. पण या सामन्यात केवळ ७.३ षटकांचा खेळ झाला होता. त्यानंतर पावसाचा व्यत्यय आल्याने उर्वरित सामना पूर्ण होऊ शकला नव्हता.