नॉटिंगहॅम - विश्वकरंडकात आज खेळल्या गेलेल्या रोमांचकारी सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा १५ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजसमोर २८९ धावांचे आव्हान दिले होते. ऑस्ट्रेलियाचे सर्व प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर स्टीव स्मिथ, अॅलेक्स कॅरी आणि नथन कुल्टर-नाइल या तिघांनी मोक्याच्या क्षणी शानदार खेळी करत कांगारुंना आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली. ऑस्ट्रेलियाच्या २८९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने दमदार खेळ केला. मात्र, शेवटच्या १० षटकांत वेस्ट इंडिजने योग्य खेळ न केल्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागले.
ट्रेंट ब्रिज स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अॅलेक्स कॅरीने ४५, स्टीव स्मिथ ७३ आणि नथन कुल्टर-नाइल ९२ धावांची वादळी खेळी. वेस्ट इंडिजकडून कार्लोस ब्रेथवेटने सर्वाधिक ३, तर शेल्डन कॉट्रेल, ओशेन थॉमस आणि आंद्रे रसल या तिघांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजची सुरुवात खराब झाली. यातून सावरताना विंडीजने शाई होप आणि निकोलस पुरन यांच्या भागीदारीच्या बळावर सामन्यात पुनरागमन केले. यानंतर कर्णधार जेसन होल्डरने ५१ धावांची खेळी करत संघाल विजयाजवळ पोहचवले होते. परंतु, मोठे फटके मारण्याच्या नादात होल्डर बाद झाला. त्यामुळे संघाच्या विजयाच्या आशा मावळल्या.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने भेदक गोलंदाजी करताना ५ विकेट घेतल्या. तर, पॅट कमिन्स २ आणि अॅडम झॅम्पाने १ गडी बाद केला. सामन्यात अष्टपैलू खेळासाठी नथन कुल्टर नाईलला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.