लंडन - वर्णद्वेषाच्या गुन्ह्यास डोपिंग आणि मॅच फिक्सिंग प्रमाणेच शिक्षा दिली जावी, असे मत वेस्ट इंडीजच्या कसोटी संघाचा कर्णधार जेसन होल्डरने दिले आहे. होल्डर म्हणाला, ''खेळात वर्णद्वेषाचा मुद्दा उपस्थित होत असून या प्रकाराला इतर गुन्ह्यांप्रमाणेच वागवले गेले पाहिजे.''
कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर जगभरात वर्णद्वेषाविरोधात निषेध व्यक्त होत आहे. या विरोधात अनेक माजी आणि दिग्गज क्रिकेटपटूंनीही आवाज उठवला. याबद्दल एका वृत्तसंस्थेला होल्डरने आपले विचार सांगितले. तो म्हणाला, "डोपिंग आणि भ्रष्टाचारावरील दंड हे वर्णद्वेषापेक्षा वेगळे असले पाहिजेत असे मला वाटत नाही. जर आपल्याकडे खेळामध्ये काही समस्या असतील तर आपण सर्वांनी समान दृष्टीकोन ठेऊन त्या सोडवल्या पाहिजेत. मालिकेपूर्वी खेळाडूंना डोपिंग, भ्रष्टाचार तसेच वर्णद्वेषाबद्दल माहिती दिली पाहिजे."
होल्डर पुढे म्हणाला, "मालिकेपूर्वी अँटी-डोपिंग आणि लाचलुचपत प्रतिबंधक बैठकीबरोबरच वर्णद्वेषाविरोधात एक बैठक व्हायला हवी. याविषयी लोकांना अधिकाधिक शिक्षित केले जावे. मला कोणत्याही वर्णद्वेषी वक्तव्याचा सामना करावा लागला नाही. पण इतरांविषयी मी सर्व ऐकत आणि पाहत आहे. ही अशी गोष्ट आहे ज्याच्यासह आपण उभे राहू शकत नाही.''
वाचा नक्की प्रकरण काय -
जॉर्ज फ्लॉइडला अटक करत असताना, एका पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या मानेवर 8 मिनिटे 48 सेंकद गुडघा ठेवला होता. जॉर्ज त्याला तो गुडघा काढण्यासाठी आर्जव करत होता, "मला श्वास घेता येत नाही, कृपया माझा जीव घेऊ नका," असे जॉर्ज म्हणत होता. मात्र, पोलिसाने त्याच्या विनवण्या ऐकल्या नाहीत आणि जॉर्जचा मृत्यू झाला. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर जगभरात वातावरण तापले आहे.