मेलबर्न - बर्याच कालावधीनंतर कसोटी क्रमवारीत पहिले स्थान मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारताला भारतातच हरवावे लागेल, असे लॅंगर म्हणाले आहेत. शुक्रवारी ऑस्ट्रेलियाने भारताला मागे टाकत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले.
लँगर यांनी सांगितले की, हे रँकिंग किती अस्थिर आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे परंतु या क्षणी चेहऱ्यावर हसू उमटणे नक्कीच चांगले आहे. आपण बनू इच्छित असलेल्या संघापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला पुष्कळ काम करावे लागणार आहे. परंतु गेल्या काही वर्षांत आम्ही मैदानाबाहेरही चांगली कामगिरी केली आहे.
ते पुढे म्हणाले, "अर्थातच आमचे ध्येय जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकणे आहे. परंतु शेवटी आम्हाला भारतामध्ये भारताचा पराभव करायचा आहे. जेव्हा ते ऑस्ट्रेलियामध्ये येतात तेव्हाही आम्हाला त्यांचा पराभव करायचा आहे.''
2016 नंतर प्रथमच कसोटी क्रमवारीत भारताला पहिले स्थान गमवावे लागले. या वर्षाच्या अखेरीस भारताला ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. 2018 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर 2-1 असे पराभूत केले होते.