कराची - पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने यंदाच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेबाबत आपले मत दिले. प्रेक्षकांशिवाय ही स्पर्धा खेळवण्याच्या दृष्टीने अक्रम सहमत नाही. कोरोना व्हायरसच्या साथीवर मात मिळाल्यानंतर आयसीसीने या स्पर्धेच्या आयोजनासाठी योग्य वेळेची वाट पाहावी, असे तो म्हणाला.
अक्रम म्हणाला, "व्यक्तिगत मला विचारले तर प्रेक्षकांशिवाय वर्ल्ड कप मला योग्य वाटत नाही. वर्ल्ड कप म्हणजे प्रेक्षकांनी गच्च भरलेले स्टेडियम. जगभरातील प्रेक्षक आपल्या संघांना पाठिंबा देण्यासाठी येतात. हा वातावरणाचा विषय आहे आणि प्रेक्षकांशिवाय वातावरण कसे असेल?'' ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या या स्पर्धेबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) 10 जूनला निर्णय घेणार आहे.
अक्रम म्हणाला, "आयसीसीने योग्य वेळेची वाट पाहावी. एकदा महामारीवर मात मिळवली आणि प्रवासावरील निर्बंध दूर झाले, तर वर्ल्डकप चांगला होईल.'' कोरोनानंतर, चेंडूवर लाळ लाळ वापरण्याच्या बंदी आणण्याच्या विषयावरही अक्रमने आपले मत दिले.
''लाळ वापरण्यावरील बंदी वेगवान गोलंदाजांना आवडणार नाही. घामामुळे तितकासा फरक पडणार नाही. अधिक घामामुळे चेंडू ओला होउ शकतो. आयसीसीने यावर त्वरित तोडगा काढला पाहिजे'', असे अक्रम म्हणाला.