कराची - मोहम्मद आमिर आणि वहाब रियाज, यांनी त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी चुकीच्या वेळी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे पाकिस्तान संघावर वाईट परिणाम झाले, असे वक्तव्य पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि सध्याच्या संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांनी केले आहे. याशिवाय त्यांनी खेळाडू देशहितापेक्षा पैशाला जास्त महत्त्व देत असल्याचा आरोपही केला आहे.
युनूस यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पत्रकारांसोबत बातचित केली. यात त्यांनी सांगितलं, की 'खेळाडू टी-२० लीगच्या माध्यमातून मोठी कमाई करतात. ते टी-२० खेळण्यासाठी स्वत:हून इच्छुक असतात. कारण या सामन्यात त्यांना केवळ चार षटके गोलंदाजी करावी लागते. हे सर्व करताना ते आपल्या देशाच्या संघाचा विचार करत नाहीत.'
मोहम्मद आमिर आणि वहाब रियाज यांनी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. यावर युनूस म्हणाले, 'तुम्ही कोणताही विचार न करता अचानक निवृत्तीची घोषणा करता. त्यांनी याविषयी पाकिस्तान बोर्डाशी चर्चा करायला हवी होती. पण त्यांनी केली नाही आणि याचे काही प्रमाणात नुकसान पाकिस्तान संघाला झाले. मला वाटतं ते अजूनही पाकिस्तान संघात खेळू शकतात.'
दरम्यान, मोहम्मद आमिरने वयाच्या २७व्या वर्षीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. तर वहाबने ३४व्या निवृत्ती घेतली. पाकिस्तानसाठी वहाबने २७ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ८३ गडी बाद केले. तर आमिरने ३६ कसोटी सामन्यात खेळताना ११९ गडी बाद केले आहेत.
हेही वाचा - IPL ला 'मिस' करतोय चेन्नईचा खेळाडू, म्हणाला.. प्रेक्षकांविना आयपीएल खेळण्यास तयार
हेही वाचा - मुलीसोबत रैना खेळतोय क्रिकेट... पाहा व्हिडिओ