नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची परत वर्णी लागली. आता इतर कोचिंग स्टाफचीही काही दिवसांत नियुक्ती केली जाणार आहे. यादरम्यान, भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने भारताच्या एका माजी कर्णधाराला निवड समितीचे अध्यक्ष केले पाहिजे असे म्हटले आहे.
सेहवागने एका कार्यक्रमावेळी आपली इच्छा बोलून दाखवली. त्याने अनिल कुंबळे याचे नाव पुढे केले. तो म्हणाला, 'कुंबळे जेव्हा कर्णधार होता तेव्हा तो एकदा माझ्या रुममध्ये आला आणि म्हणाला, तू जसा खेळतोस तसाच खेळत राहा. तुला दोन मालिकेपर्यंत कोणीही संघातून काढणार नाही. या बोलण्याने मला आत्मविश्वास मिळाला. मला वाटते की कुंबळे निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार आहे.'
२०१६ ते २०१७ पर्यंत अनिल कुंबळे टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होता. त्यानंतर, २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर, कुंबळेने मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. कुंबळे सध्या आयसीसीच्या क्रिकेट समितीचा चेअरमन आहे.
निवड समितीचे प्रमुख एम.एस.के प्रसाद यांच्या समितीमार्फत, कोचिंग स्टाफची नियुक्ती केली जाणार आहे. २०२१ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत नवीन मुख्य प्रशिक्षकाचा कालावधी राहणार आहे. सोबत कोचिंग स्टाफचा कार्यकाळही याच विश्वकरंडकापर्यंत असणार आहे.