दुबई - कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात संथ खेळी करणारा, चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू केदार जाधव याच्यावर सोशल मीडियातून टीकेची झोड उठली आहे. याशिवाय अनेक मातब्बर खेळाडूंनी केदारच्या त्या खेळीचा खरपूर समाचार घेतला आहे. यात भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग याने तर शेलक्या शब्दात केदारला सुनावले आहे.
विरेंद्र सेहवाग आयपीएलच्या सामन्यांचे, आपल्या 'विरू की बैठक' या कार्यक्रमातून विश्लेषण करत आहे. यात त्याने कोलकाताविरूद्धच्या सामन्यात संथ खेळी करणाऱ्या केदारवर टीकेची तोफ डागली. केदार जाधव म्हणजे हुंड्यात आलेल्या मेव्हण्यासारखा आहे. ना तो धावा करण्यास समर्थ ठरतोय, ना तो चांगलं क्षेत्ररक्षण करत आहे. त्याला संघात घेऊन आता धोनीदेखील विचार करत असेल की, खाया पिया कुछ नहीं, ग्लास तोडा आठ करोड का, अशा शब्दात सेहवागने केदारला सुनावले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, कोलकाताने दिलेल्या १६८ धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाने आश्वासक सुरुवात केली. फाफ डु-प्लेसिस आणि शेन वॉटसनने चांगली सुरूवात केली. शिवम मावीने डु-प्लेसिसला माघारी धाडत चेन्नईला पहिला धक्का दिला. यानंतर वॉटसन-अंबाती रायुडू या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी करत चेन्नईचा डाव सावरला. ही जोडी चेन्नईला विजयपथावर घेऊन जाणार असे वाटत असतानाच कमलेश नागरकोटीने रायुडूला माघारी धाडले.
दुसरीकडे शेन वॉटसनही आपले अर्धशतक पूर्ण करत, सुनिल नरेनचा बळी ठरला. यानंतर फलंदाजांच्या हाराकिरीमुळे चेन्नईचा पराभव झाला. यात केदार जाधवने शेवटच्या षटकात दोन चेंडू निर्धाव घालवले. तसेच या सामन्यात केदारला १२ चेंडूत फक्त ७ धावाच करता आल्या.
चेन्नईच्या पराभवानंतर सेहवागने चेन्नईच्या फलंदाजांना खडेबोल सुनावले. त्याने, चेन्नईचे काही फलंदाज हे सरकारी कर्मचारी असल्यासारखे वागतात. त्यांना ही गोष्ट माहिती असते की, कसेही खेळले तरी, पगार तर मिळणारच आहे, असे स्पष्ट मत सेहवागने एका क्रीडा संकेतस्थळाशी बोलताना व्यक्त केले.